सावंतवाडी तालुक्यातील मळगाव व सोनुर्ली गावचे दैवत श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शनिवार ६ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला मळगाव पंचायतनची तरंगकाठी व पालखी सोनुर्ली येथे श्री देवी माऊलीच्या भेटीसाठी जाते. तर दोन पूर्व देवाच्या जत्रोत्सवादिवशी श्री देवी माऊली देवांच्या भेटीसाठी दोन पूर्वस जत्रोत्सवादिवशी मळगाव येथे येते. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवादिवशी काही कारणास्तव कोणाची माऊलीची ओटी भरणे राहीले असेल तर दोन पूर्वस जत्रोत्सवादिवशी श्री देवी माऊलीची ओटी भरून नवसफेड केली जाते. अशा या दोन गावचे दैवत असलेल्या श्री देव दोन पूर्वस देवाचा जत्रोत्सव उद्या ६ जानेवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी श्री देवी माऊलीचे वाजगाजत आगमन, त्यानंतर श्री देवी माऊलीची ओटी भरणे, दोन पूर्वस देवाला केळी नारळ ठेवणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मंदिराभोवती भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर खानोलकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव ग्रामस्थ व देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.