पत्रकारिता पारदर्शक आणि ती टिकवून ठेवता आली पाहीजे!पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लिखाण केल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही!! महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता सकारात्मक !शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

सिंधुदूर्ग

पत्रकारिता पारदर्शक असली पाहीजे आणि ती टिकवून ठेवता आली पाहीजे, ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी टिकवून ठेवलेली आहे.
पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लिखाण केल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही, पत्रकाराने एखादा विषय निवडून त्याचा परिपूर्ण अभ्यास केला पाहीजे. त्या विषयाची स्पेशालिटी तुमच्याकडे असली पाहिजे असे मत जिल्हयाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात बोलताना मत व्यक्त केले.

मराठी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन सभागृहात जिल्हा पत्रकार संघामार्फत पत्रकार दिन व पत्रकार पुरस्कार कार्यक्रम पार पडला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रमुख वक्ते तथा ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, कुडाळ तह‌सीलदार अमोल पाठक, जिल्हाबँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलयंत, संघाच्या सचिव देवयानी ग्ररसकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, गणेश जेठे, संतोष वायंगणकर, नंदकिशोर महाजन बाळ खडपकर,विद्याधर कैनवडेकर, रमेश जोगळे, महेश सरनाईक, संतोष राऊळ, संतोष सावंत, महेश रावराणे, दाजी नाईक, संदीप देसाई, लघु, खरबत, महेश रावराणे उपस्थित होते.
यावेळी तरुण भारतचे मुख्य उपसंपादक अवधूत पोईपकर यांना आदर्श जिल्हा पत्रकार पुरस्कार , मसुरे प्रतिनिधी दत्तप्रसाद पेडणेकर यांना आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार, दोडामार्ग प्रतिनिधी गणपत डांगी यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.जिल्हा पत्रकार संघामार्फत वितरीत करण्यात आलेल्या अन्य पुरस्कारामध्ये जीवन गौरव पुरस्कार माधव कदम, ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवलीचे चंद्रशेखर तांबट, युवा पत्रकार पुरस्कार वैभववाडीचे श्रीधर साळुंखे, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्गनगरीचे नंदकुमार आगरे, कुडाळचे प्रमोद म्हाडगुत वेंगुर्लाचे प्रथमेश गुरव, देवगडचे दयानंद मांगले यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, रोखरक्कम देऊन गौरविण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाच्या सचिव देवयानी वरसकर यांनी केले. सुत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले.स्वागत तोरस्कर यांनी केले, तर आभार संतोष सावंत यांनी मानले.