रामनामाच्या अखंड जयघोषात मळगाव झाले ‘राममय ‘


रामभक्तांनी काढलेल्या मिरवणूकीला उत्स्फूर्त प्रतिसाद,भूतनाथ मंदिर परिसरातील राममूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची ‘गर्दी’
सावंतवाडी :
अयोध्या येथील श्रीराम मंदिर उदघाटन व श्रीरामाच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने मळगाव गावातील श्रीराम भक्तांच्यावतीने श्रीराम प्रतिमा पूजन व प्रभू रामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
भूतनाच मंदिर येथे असलेल्या श्रीराम मूर्तीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दर्शन, मिरवणूक, महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, महिलांचे हळदीकुंकू फुगड्या व भजन आदी कार्यक्रमांसह अखंड रामनामाच्या जपामुळे सर्व मळगाव ‘राममय ‘ झाले होते.
या सोहळ्यानिमित सकाळी भूतनाथ मंदिर येथील श्रीराम मूर्तीची विधिवत पूजा, अभिषेक, गाऱ्हाणे आदी कार्यक्रम संपन्न झाले. या राम मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. १० वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली.



या मिरवणुकीत राममुर्ती असलेला सजवलेला रथ, रथात राम, लक्ष्मण, हनुमान तसेच वानरसेना यांची वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते. मिरवणूकीत सहभागी भक्तगणांनी परिधान केलेल्या भगव्या टोप्या, भगवे कुर्ते व भगव्या झेंड्यांमुळे सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी श्रीराम जय राम जयजयराम, जय श्रीराम, प्रभु रामचंद्र की जयचा श्रीराम भक्तांनी जयघोष करीत गावातील पिंपळवाडी हनुमान मंदिर, मायापूर्वचारी मंदिर, रेडकरवाडी, आजगावकरवाडी, विठ्ठल-रखुमाईमंदिर, रवळनाथ मंदिर, सावळवाडा, कुंभारआळी, देऊळवाडी, गावकरवाडी, सुतारवाडी महापुरुष देवस्थान, रस्तावाडी, छत्रपती शिवाजी चौक, रेल्वे स्टेशन, दोन पूर्वस मंदिर, तेलकाटावाडी, खरोबा देवस्थान आदी गावातील सर्व प्रमुख मंदिरांना व वाड्यांना भेट देत संपूर्ण गावात ही मिरवणूक काढण्यात आली.


मिरवणुकी दरम्यान प्रत्येक मंदिराजवळ व वाडीत रामनामाचा व ग्रामदेवतेचा जयघोष करण्यात आला. दुपारनंतर गावातील श्रीदेव भूतनाथ मंदिरच्या आवारात असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन सुरू झाले. दुपारी २ वाजता महाआरती त्यानंतर उपस्थित सर्वांना महाप्रसाद वितरण करण्यात आला. त्यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू, महिलांच्या फुगड्या, सायंकाळी महा दीपोत्सव व त्यानंतर गावातील भजन मंडळांचे भजन आदी कार्यक्रम पार पडले. मळगाव गावातील भक्तगणांनी उस्फूर्तपणे या सोहळ्यात सहभाग घेतल्याने संपूर्ण गावच राममय झाले होते. मळगाव गावातील असंख्य भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेतला.