तळवडे येतील श्री जनता विद्यालयाचे एनएनएमएस परीक्षेत यश

सावंतवाडी

तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश विवध स्पर्धामध्ये मिळविले आहे. या विद्यालयाचे ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यातील दोघांची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना (एनएनएमएस) परीक्षेत या प्रशालेतील मुलांनी यश मिळवले.

या वर्षीही प्रशालेने या परीक्षेतील उज्वल परंपरा कायम ठेवली आहे .कौस्तुभ योगेश दळवी याने सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये ११० गुणांसह जिल्हात १७ वा तर तालुक्यात ४ वा क्रमांक पटकावला आहे. श्रेयस संतोष परब यांने १०४ ‌गुणांसह सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये २६ वा‌ तर तालुक्यात ७ वा क्रमांक प्राप्त केला आहे.

प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षांसाठी दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्याचबरोबर या विद्यालयातून कु. गौरवी भरत गावडे, रामचंद्र समीर परब, कु सायली संतोष आचरेकर, कु. वेदिका गंगाराम मोर्ये हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर तसेच सर्व संस्थाचालक यांनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.