होडावडे येथे २९ मे रोजी प्रा. रूपेश पाटील यांचे ‘चला, शोधूया करिअरच्या वाटा.!’ व्याख्यान.

सावंतवाडी :

नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. मात्र असे असले तरी विविध स्पर्धा परीक्षांच्या निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती समाधानकारक नाही, ही बाब विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत हवे ते मार्गदर्शन मिळत नाही. जर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी देशात नाव कमविल्याशिवाय राहणार नाही. यासाठी विविध करिअर मार्गदर्शन वर्ग आयोजित करणे आवश्यक आहे. यासाठी होडावाडे येथील होडावडे ग्रामोन्नती मंडळ, मुंबई यांनी पुढाकार घेत सद्या महाराष्ट्रभर गाजत असलेले स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन केले आहे. बुधवार, दिनांक २९/०५/२४ रोजी सकाळी १० वाजता केंद्र शाळा होडावडे, नं.१ येथे सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील (स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक) यांचे ‘चला, शोधूया करिअरच्या वाटा.!’ या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. तरी होडावडे परिसरातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक होडावडे ग्रामोन्नती मंडळ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.