शारदा विद्यालय मळगाव प्रशालेत नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव, स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव, स्वागत समारंभ तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, सौ. मेस्त्री, सौ. वारंग, सौ. जाधव व पालकवर्ग आदी उपस्थित होते. यावेळी पाहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या नवोदित मुलांचे, इतर शाळांमधून आलेल्या मुलांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रत्येक नवोदित मुलांना त्यांच्या नावाच्या कागदी टोप्या परिधान करण्यात आल्या होत्या. ढोल ताशांच्या गजरात या नवोदित मुलांची मळगाव बाजारपेठेतून शाळा परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी केले.