भक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष , महिला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून फेडले नवस

नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी,माऊली देवस्थान कमिटीने , मानकरी यांनी केले योग्य नियोजन!,पोलिस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांचे लाभले मोलाचे सहकार्य

सावंतवाडी प्रतिनिधि

भक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष महीला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून आपला नवस फेड केला, मंगळवारी रात्रौ जत्रौत्सवात पार पडलेला हा नयनरम्य क्षण पाहण्यासाठी लाखों भाविकांची गर्दी उसळली होती.दुसर्‍या दिवशी बुधवारी तुलाभाराने आणि देवीच्या कौलाने जत्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली.

दक्षिण कोकणची प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली श्री देवी माऊली चा दोन दिवस चालणाऱ्या जत्रोत्सवाला मंगळवारी रात्रौ तुफान गर्दी उसळली, मंदिराकडे जाणारे रस्ते आणि परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. दिवसभर असलेल्या तुरळक गर्दीचे रुपांतर रात्रौ आठनंतर भाविकांचा जनसागरात पाहायला मिळाले. रात्रौ ठिक साडेदहा वाजता देवीची पालखी कुळघराकडून वाजत गाजत फटाक्याच्या आतषबाजीत मंदिरात दाखल झाल्यानंतर विधीवत प्रथेप्रमाणे अकरा वाजता लोटांगणाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. तत्पूर्वी भाविक भक्तांना देवीचे दर्शन आणि ओटी केळी ठेवण्याचे काम अविरत सुरु होते. पालखी मंदिरात आल्यानंतर हा कार्यक्रम बंद ठेवण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून लोटांगणाला सुरूवात झाली व मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करीत त्याच पायरीपर्यंत येऊन ती पूर्ण केली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही हजारो महीला पुरुष भक्तांनी लोटांगण घालून आपल नवस फेड केला. यावर्षीही महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. लोंटागणाचा कार्यक्रम सुरु होताच श्रीदेवी माऊलीच्या अवसारांनी तरंगकिठीसह भक्तांना दर्शन दिले. हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होता पुरुष भाविकांची लोटांगणे पार पडतात महिलांची लोटांगणे झाली. हजाराहून जास्त महिला व पुरुष भाविकांनी देवी चरणी लोटांगण अर्पण केले.
या कार्यक्रमासाठी पोलिस बंदोबस्त कडेकोट होता. मंदिराभोवती लोटांगणाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. अनेक हात लोटांगण घालणाऱ्या नवसकरी भाविकांना लोटांगण व्यवस्थित पार पाडण्यासाठी झटले होते. तब्बल दोन तासाहून अधिक वेळ पुरुष भक्ताची लोटांगणे सुरु होती. त्यानंतर महिलांची लोटांगणे सुरु झाली. देवस्थान कमिटीकडून यावर्षी लोटांगण घालणाऱ्या महिला पुरुष भक्तासांठी आंघोळीसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. नव्याने उभारलेल्या इमारतीमध्ये ही व्यवस्था होती.
बुधवारी सकाळी गावातील गावकरी मंडळी केळीकुळ आदींनी देवीच्या दर्शनासाठी व केळी नारळ ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. याचवेळी सुरू असलेल्या तुलाभार कार्यक्रमालाही मोठी गर्दी होती. अडी अडचण असलेल्या भाविकांनी आपल्या वजनाएवढे वस्तू देऊन नवस फेड केला हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरु होता.