आई – बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी जिद्दीने अभ्यास करा.! : प्रा. रुपेश पाटील.

तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न.

देवगड

देवगड : आपला मुलगा किंवा मुलगी शिकून मोठा व्हावा, त्याने यशाला गवसणी घालावी आणि आपले व गावाचे नाव रोशन करावे, अशी प्रांजळ अपेक्षा प्रत्येक आई-बाबांची असते. मात्र अलीकडच्या काळात काही विद्यार्थी आपल्या आई-बाबांच्या भावनांशी खेळतात, हे चुकीचे आहे. आई-बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर प्रामाणिक अभ्यास करा, ध्येयाने प्रेरित होऊन स्वतःला शिस्त लावून घ्या. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील यांनी तळेबाजार येथे आयोजित कार्यक्रमात केले.

देवगड तालुक्यातील तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, तळेबाजार संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर प्रशालेचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन ३ जानेवारी रोजी संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलत असताना प्रा. रूपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून देवगड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश शंकरराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष व यशस्वी उद्योजक संदीपशेठ तेली, उपाध्यक्ष राजेंद्र महापसेकर, सचिव कृष्णा साटम, खजिनदार संतोष वरेरकर, सदस्य बाळकृष्ण पारकर, विश्वास सावंत, संजय जाधव, वरेरी गावाच्या सरपंच सुप्रिया गोलतकर, चांदोशी सरपंच सौ. दिपाली मेस्त्री माजी मुख्याध्यापक आर. एम. हिंदळेकर, शिक्षक पालक संघ सदस्य रघुनाथ धर्णे, तसेच तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे तमाम सहकारी सदस्य, मुख्याध्यापक रघुनाथ घोगळे, प्रभारी मुख्याध्यापक राजेश वाळके, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुशील जोईल, विद्यार्थी प्रतिनिधी पियुष अनभवणे, विद्यार्थिनी प्रतिनिधी पूर्वा राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा संस्थाध्यक्ष संदीपशेठ तेली व इतरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दरम्यान, यावेळी प्रा. रुपेश पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून आधुनिक काळात विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाची कास धरावी, विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोबाईलचा वापर करावा. मात्र अनाठायी वापर टाळावा, असे देखील आवाहन केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व देवगड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनीही विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात प्रामाणिक प्रयत्न जिद्द, चिकाटी, संयम व वरिष्ठांची प्रेरणा या गुणांचा पुरेपूर वापर केल्यास यशाला नक्की पोहोचता येणार असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्वतःच्या जीवन प्रवासाचाही उल्लेख करत शिक्षण पद्धती कशी विकसित होत आहे ?,याचे उदाहरण दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्था अध्यक्ष संदीपशेठ तेली म्हणाले, आगामी काळात तळेबाजार येथे नर्सिंग कॉलेज आणण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता संस्थेद्वारा जे जे करता येईल ते सर्व करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत असून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांची साथ मिळाल्यास आगामी काळात तळेबाजार गावाचा आणि पंचक्रोशीचा शैक्षणिक कायापालट नक्की करू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक राजेश वाळके यांनी केले. बहारदार सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका मृण्मयी जाधव यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षिका सौ. डी. डी. परब यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सहाय्यक शिक्षक ए. ए. कदम, सौ. एन. एस. चव्हाण, सौ. एम. ए. जाधव, एस. के. जोईल, बी. डी. कोकरे, श्रीमती. व्ही. एम. माने, सौ. डी. डी. परब, सौ. एस. एम. चनबसुगोळ, जी. के. तेली, एम. आर. चव्हाण, तसेच लिपिक अंकुश वरक, प्रयोगशाळा परिचर आर. एल. जाधव व शिक्षकेतर कर्मचारी एन. व्ही. खरात, एस. बी. बेले. आदींनी प्रयत्न केले.