माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार!! आम.तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


सावंतवाडी,
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर येत्या पंधरा दिवसांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ रूग्णवाहीकांच लोकार्पण करण्याचा मानस असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब उपस्थित होते.
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. विशेषतः महिलांसाठी लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, युवक, ज्येष्ठ, शेतकरी, रूग्णांसाठी त्यांनी विविध योजना राबविल्या. अशा लोकनेत्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत. या निमित्ताने आज ९ फेब्रुवारी रोजी कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
तसेच मतदारसंघात मिठाई व फळ वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातही विविध कार्यक्रम होणार आहेत. संपूर्ण मतदारसंघासाठी एक भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यात मतदारसंघातील क्रिकेटप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. १३,१४ व १५ फेब्रुवारी रोजी महसूलच्या स्पर्धा होत आहेत. १६ फेब्रुवारी पासून जिल्हा परिषद निहाय पक्षाच्यावतीने महसूल दाखले वितरित करण्यात येणार आहेत अशी माहिती श्री. केसरकर यांनी यावेळी दिली. या सर्व कार्यक्रमांत कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे अन्य मान्यवर उस्थितीत रहाणार आहेत.