मळगाव गावची होळीची आगळीवेगळी परंपरा,सुवार्डा डोंगराच्या शिखरावर पहिली होळी उभारून सात दिवसांच्या शिमगोत्सवास सुरुवात


असंख्य वर्षांची परंपरा मानकरी व ग्रामस्थ एकोप्याने जोपासत आहेत
सावंतवाडी : प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या अशा काही ठराविक परंपरा असतात. काही गाव तर ह्या आगळ्यावेगळ्या परंपरा जोपासण्यासाठी ओळखले जातात, अशीच एक होळीची आगळी वेगळी परंपरा जपणारा गाव म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गाव होय. मळगाव गावातील उंच असलेल्या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची मानाची पहिली होळी उभारली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची भगवा निशाण लावून पहिली होळी उभारून मळगाव गावच्या सात दिवसांच्या शिमगोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. असंख्य वर्षांपासून चालत आलेली ही अनोखी परंपरा मळगाव गावचे मानकरी व ग्रामस्थ एकोप्याने जोपासत आले आहेत. मळगाव गावातील मानाच्या होळीसाहीत सर्व होळ्या या होळी पौर्णिमेपासून सात दिवसांचा शिमगोत्सव संपल्यावर एका महिन्यानंतर चैत्र पौर्णिमेला होळी तोडण्यात येते. मात्र सुवार्डा डोंगरावरील ही होळी तोडली जात नाही, तर पुढील होळीपौर्णिमा सण येईपर्यंत भगवा निशाण फडकवत दिमाखात उभी असते, हे या होळीचे एक खास वैशिष्ट्य आहे. दरवर्षी जुनी होळी विसर्जित केली जाते व नवीन होळी भगवा निशाण लावून उभारली जाते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सकाळी कुळघराकडून तरंगकाठीचे पूजन करून गावचे राऊळ, गावकर (मानकरी) सवाद्य वाजत गाजत येथील सुवार्डा डोंगरावर गेले. तिथे गेल्यावर होळीसाठी लागणाऱ्या झाडाचे विधिवत पूजन करून ते होळीसाठी तोडण्यात आले. नंतर वाजतगाजत मानकऱ्यांच्या उपस्थितीत होळी सुवार्डा डोंगराच्या शिखरावर आणून तिला सजविण्यात आले. होळी सजविल्यावर तेथेच डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची पहिली होळी उभारण्यात आली. होळी उभारल्यावर होळीसमोर रांगोळी काढून तिची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सामूहिक व नवसाचे गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी होळीला नारळ, पेढे, नवसाचे नारळाचे तोरण ठेवले. नवसाचे गाऱ्हाणे झाल्यावर उपस्थित सर्वांना पेढा व प्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी मळगाव गावची मानाची होळी मळगावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिरासमोर उभारण्यात येणार आहे त्यानंतर गावातील वाडी-वाडीत होळ्या उभारण्यात येणार आहेत. मळगाव गावचा शिमगोत्सव हा सात दिवसांचा साजरा करण्यात येणार आहे.