गोवा-सोलापूर–गोवा हवाई मार्ग सुरू; नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर हे फ्लाय९१च्या वाढत्या प्रादेशिक नेटवर्कमधील आठवे गंतव्य ठरले असून, केवळ महाराष्ट्रातीलच हे चौथे गंतव्य आहे.

गोवा-सोलापूर–गोवा हवाई मार्ग सुरू; नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

~
सोलापूर हे फ्लाय९१च्या वाढत्या प्रादेशिक नेटवर्कमधील आठवे गंतव्य ठरले असून, केवळ महाराष्ट्रातीलच हे चौथे गंतव्य आहे.

        
~आठवड्यातून चार वेळा सेवा उपलब्ध.

पणजी,

भारतातील प्रादेशिक हवाई संपर्क विस्ताराच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा गाठत, गोवा-स्थित फ्लाय९१ या विमान कंपनीने सोलापूर–गोवा दरम्यानची नवी विमानसेवा आजपासून अधिकृतपणे सुरू केली आहे. या सेवेमुळे सोलापूर हे फ्लाय९१ च्या वेगाने विस्तारणाऱ्या नेटवर्कमधील आठवे गंतव्यस्थान ठरले आहे.



सोलापूर विमानतळावर फ्लाय९१च्या उद्घाटन उड्डाणाचे जलतोरणाद्वारे उत्साहात स्वागत करण्यात आले. या माध्यमातून फ्लाय९१ महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक व औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमध्ये आपली सेवा औपचारिकपणे सुरू केली आहे.

सोलापूरहून गोव्याकडे निघालेल्या उद्घाटन उड्डाणाला नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या प्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, स्थानिक आमदार, सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि फ्लाय९१ चे प्रतिनिधी उपस्थित होते.

“गोव्यातून फ्लाय९१च्या उद्घाटन उड्डाणाच्या आगमनानंतर सोलापूर आता भारताच्या हवाई नकाशावर आले आहे. ही हवाई सेवा यात्रेसाठी, व्यवसायासाठी आणि इतर कारणांकरिता सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करेल,” असे मोहोळ यांनी सोलापूर विमानतळावर गोव्याकडे जाणाऱ्या फ्लाय९१च्या उद्घाटन उड्डाणापूर्वी आयोजित समारंभात सांगितले.

गोवा–सोलापूर–गोवा ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस (सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार) www.fly91.in या संकेतस्थळावर दिलेल्या नियोजित वेळेनुसार सुरु राहील. फ्लाय९१ च्या प्रादेशिक दृष्टिकोनानुसार, उड्डाणादरम्यान सूचना मराठीत – महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा – आणि इंग्रजीत दिल्या जातात.

“आज सोलापूरकरांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. हे विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी आणि त्यानंतर गोवा–सोलापूर–गोवा या FLY91 च्या नवीन मार्गाची सेवा सुरू होण्यासाठी अनेक व्यक्तींनी अथक परिश्रम घेतले आहेत. आज या मार्गावरील उद्घाटन उड्डाण झाले असून, गोवातून निघालेलं पहिलं विमान आज सकाळी सोलापूर विमानतळावर उतरलं,” असे गोरे यांनी नमूद केले

फ्लाय९१ ही कंपनी भारतातील दुर्गम व कमी संपर्क असलेल्या भागांना हवाई मार्गांनी जोडण्याच्या उद्दिष्टाने कार्यरत आहे. सोलापूरचा समावेश झाल्यामुळे आता ही सेवा आठ शहरांमध्ये कार्यरत आहे, ज्यात महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग आणि सोलापूर ही प्रमुख शहरे समाविष्ट आहेत.

“गोवा–सोलापूर–गोवा हा नवीन हवाई मार्ग केवळ दोन शहरांमधील प्रवास सुलभ करत नाही, तर सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध असलेल्या या दोन प्रदेशांना नव्या प्रकारे जोडतो. पर्यटन, व्यापार, कुटुंबीय भेटी आणि यात्रेकरूंसाठी ही सेवा अधिक सोयीस्कर, जलद आणि परिणामकारक ठरेल. प्रादेशिक हवाई संपर्क बळकट करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, सोलापूरसारख्या महत्त्वाच्या शहराचा आमच्या नेटवर्कमध्ये समावेश होणे, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे,” फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको म्हणाले,
सोलापूर हे केवळ कापड उद्योग व औद्योगिक अधिष्ठानासाठीच नव्हे, तर पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि भीमाशंकर या पाच प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या प्रवेशद्वारासाठीही ओळखले जाते. त्यामुळे गोव्यातून येणाऱ्या भाविक, पर्यटक व व्यावसायिकांसाठी ही सेवा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे