सिंधुरत्न समृद्ध योजनेतून कोकणात शाश्वत विकासाचे मॉडेल राबविण्यात येणार !शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सिंधूरत्न समृद्धी योजनेतून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार

महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास अनेक कुटुंबे समृद्ध होऊ शकतात!


सावंतवाडी

सिंधुरत्न समृद्ध योजनेतून कोकणात शाश्वत विकासाचे मॉडेल राबविण्यात येणार आहे. ही योजना पथदर्शी असून येथील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

बचत गट सक्षम झाल्यास त्या गटाला जोडली गेलेली कुटुंबे देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. यासाठी या योजनेअंतर्गत उपलब्ध होणार्‍या विविध रोजगारांसाठी महिलांनी स्वतःहून पुढे येणे गरजेचे आहे, असे मत सिंधूरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष तथा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.सावंतवाडी नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व सिंधुरत्न समृद्धी योजना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नगरपालिका हद्दीतील महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तत्पूर्वी या मेळाव्याचे उद्घाटन मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सागर साळुंखे, सिंधू रत्न समृद्धी योजनेचे प्रकल्प व्यवस्थापक आनंद तेंडुलकर, कृषी विभागाच्या पी एम एफ विभागाचे क्षेत्रीय अधिकारी योगेश वालावलकर, आर्किटेक्ट अमित कामत, सूरज परब, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शहर अभियान व्यवस्थापक एकनाथ पाटील, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, नगरसेविका दिपाली भालेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.