सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या श्लोक पठण स्पर्धेत केजीच्या श्रीराज कोंडुसकरने पटकावला प्रथम क्रमांक

सावंतवाडी

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक आणि गीताई पठणाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराज कोंडुस्कर, सर्वज वराडकर, कनक काळोजी आणि वेदांगी पटवर्धन यांनी पटकावला.
स्पर्धा मळगाव येथील वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या उद्यानामध्ये पार पडली या स्पर्धेतील विजेत्यांना सन मराठी दूरचित्रवाणीच्या कलाकारांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
लहान मुलांच्या या श्लोक गायन स्पर्धेमध्ये येऊन त्यांच्या स्पष्ट आवाजातील उच्चारातील श्लोक ऐकून मन भारावून गेले .त्यांच्यासोबत काही काळ घालवण्यास मिळाले याबद्दल आपणास अतिव आनंद होत आहे. वेतोबा सारख्या मालिकेमधून छोट्या पडद्यावर येणारे आम्ही छोटे कलाकार आहोत तरीसुद्धा आपणास या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी करून दिले याबद्दल मन भरून आले ,असल्याचे गौरवोद्गार सन मराठीच्या वेतोबा मालिकेतील भोळ्या मामा फेम विवेक वाळके यांनी व्यक्त केले त्यांच्यासह या मालिकेतील शालग्या फेम मंगल राणे याही उपस्थित होत्या.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्लोक पठण स्पर्धेच्या बक्षीस वितरण या दोघांच्या हस्ते झाले, यामध्ये केजी विद्यार्थी श्रीराज कोंडुसकर याने उत्तम मनाचे श्लोक पठण केल्याबद्दल त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले ..तर पहिली ते चौथी या गटामध्ये प्रथम क्रमांक सर्वज सूर्यकांत वराडकर याला, द्वितीय क्रमांक अनुप्रिया अजित राणे, तृतीय क्रमांक गायत्री पुरुषोत्तम शेणई आणि उत्तेजनार्थ पारितोषिक हर्षिता जयशंभो सावंत यांना प्रदान करण्यात आले .पाचवी ते सातवी या गटामध्ये गीताई पठणाच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कनक दिनानाथ काळोजी याने तर द्वितीय क्रमांक नमिता वामन देसाई तृतीय क्रमांक ऋतुजा मातोंडकर आणि उत्तेजनार्थ पारितोषिक चिन्मय कोटणीस यांनी पटकावले. आठवी ते दहावी या गटामध्ये प्रथम क्रमांक वेदांगी पटवर्धन हिने पटकावला ,तर द्वितीय क्रमांक ध्वनी काळोजी यांनी पटकावला. या स्पर्धेत या गटात केवळ दोनच विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी झालेल्या बक्षीस वितरण समारंभास वृक्षवल्ली डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर विजय नाईक, सिद्धेश नाईक जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार एडवोकेट संतोष सावंत,सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराठकर खजिनदार रामचंद्र कुडाळकर,ज्येष्ठ पत्रकार आशुतोष भांगले, प्रवीण परब,उमेश सावंत मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर श्रीमती कुमुदिनी गोळे तर परीक्षक श्री शंकर प्रभू श्री मनोहर परब आदी उपस्थित होते.
झालेल्या स्पर्धेत एकूण 53 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता चार गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. पहिला गट केजी अंगणवाडी बालवाडी, दुसरा गट पहिली ते चौथी तिसरा गट पाचवी ते सातवी आणि चौथा गट आठवी ते दहावी असा होता या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय झालेल्या या स्पर्धेत मनाचे श्लोक आणि गीताई पठण भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे पठण स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी मराठी श्लोक पठणाबरोबर संस्कृत श्लोक पठणही केले .या स्पर्धेमध्ये परीक्षक श्री प्रभू यांनी मनाचे श्लोक आणि गीताई याबद्दलची उपयुक्त माहिती दिली तर कौस्तुभ पेडणेकर यांनी रॅपिड प्रश्न विचारून मुलांच्या सामान्य ज्ञानाला चालना दिली. या स्पर्धेतील विजेत्यांना आयोजकांबरोबर कुमुदिनी गोळे यांनी उत्स्फूर्त अशी दोन अधिकची पारितोषिके प्रदान केली.या स्पर्धेचे सूत्रसंचालन सचिव मयूर चराठकर यांनी तर आभार प्रदर्शन आशुतोष भांगले यांनी केले.