ओरोस कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या तळवडे गावात दाखल

कृषीकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत तळवडे येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार

सावंतवाडी


सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे कृषी महाविद्यालय ओरोस येथील कृषीकन्यांचे आगमन झाले आहे. यावेळी तळवडे गावच्या सरपंच वनिता मेस्त्री यांनी कृषीकन्यांचे स्वागत केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथे या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. कृषी महाविद्यालय किर्लोस,ओरोस चे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, प्रा.गोपाल गायकी, प्रा. महेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस्वी देऊलकर, वेदांगी चव्हाण, अलविना जोसेफ, रीबा राज,कार्तिका प्रकाश, अद्वैता गंगाधरन, निवेदिता के. व्ही. या कृषीकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत तळवडे येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी ग्रामपंचायत तळवडे गावच्या सरपंच वनिता मेस्त्री,कृषी सहाय्यक ममता तुळसकर ग्रामस्थ महेंद्र गावडे, चंद्रकांत गावडे यांनी कृषी कन्यांचे स्वागत केले.
कृषी शिक्षणाच्या माध्यमातून या कृषी कन्या येथील शेतकऱ्यांच्या सहयोगाने शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, चारा पिके, पारंपारिक नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणे, वृक्ष लागवड करणे,कृषी विषयक कार्यशाळा घेणे असे विविध उपक्रम राबवणार आहेत.