दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव आज,लाखों भाविक याची होणारं गर्दी

सावंतवाडी प्रतिनिधी

दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक कृष्ण प्रतिपदा मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे . यावर्षी लोटांगण घालणाऱ्या भाविकांसाठी आंघोळ करण्यासाठी महिला व पुरुष भक्तगणांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वच्छतागृह ,स्नानगृह यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे यावर्षी भक्तगणांची चांगल्या प्रकारे सोय देवस्थान कमिटी व मानकरी वर्ग मार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे लोटांगण झाल्यानंतर होणारी गर्दी यावर नियंत्रण बसणार आहे.
लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जत्रोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरेबरच मुंबईसह राज्यभरातून व गोवा कर्नाटकातून लाखो भाविक येतात. या जत्रेत नवस फेडण्यासाठी लोटांगणे घालण्याची प्रथा आहे.या जत्रोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांना चांगली सेवा देण्यासाठी देवस्थान समितीबरोबरच वीज वितरण पोलिस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांच्या वाहनांसाठी पीर्किचींही जागा निश्चित करण्यात आली असून न्हावेली सोनुर्लीमार्गे तसेच वेत्ये सोनुर्लीमार्गे अशा दोंन्ही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.जत्रोत्सवासाठी सावंतवाडी पोलिसांनीही खास बंदोबस्त तैनात केला आहे.पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.होमगार्डचे पथकही याकामी पोलिसांना सहकार्य करणार आहेत.रात्री ११ वाजता लोटांगणाचा कार्यक्रम होणार असून दुसऱ्या दिवशी तुलाभाराने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.माऊली मंदिर देवस्थान समितीचे पदाधिकारी व सदस्य सर्व मानकरी ग्रामस्थ या जत्रेसाठी मेहनत घेत आहेत.