घरी गृहप्रवेश असतानाही रक्तदाते साईराज गिरप (उभादांडा ता. वेंगुर्ला) यांनी वाचविले रुग्णाचे प्राण

रक्तदाते साईराज गिरप (उभादांडा ता. वेंगुर्ला)

घरी गृहप्रवेश असतानाही वाचविले रुग्णाचे प्राण

कुडाळ
बुधवार दि. ०४ जून २०२५ रोजी कुडाळमधील एका खाजगी रुग्णालयात डायलेसिस साठी एक रुग्ण दाखल झाला होता. डायलेसिसचेवेळी पेशंटचे हिमोग्लोबिन जर प्रमाणापेक्षा कमी असेल तर काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यासाठी पेशंटचे हिमोग्लोबिन चांगले असणे अत्यंत आवश्यक असते. सदर पेशंटला एक युनिट रक्त देऊनही हिमोग्लोबिनमध्ये वाढ होत नव्हती.
रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णाला बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या दोन PCV ची आवश्यकता होती. जिल्हा रुग्णालय रक्तपेढीतून त्यापैकी एकाच युनिटची पूर्तता झाली होती.
दरम्यान जिल्हा रुग्णालय रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांनी पेशंटच्या नातेवाईकांना ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांचा संपर्क क्रमांक दिला असता नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधला.
बाबली गवंडे यांनी सदर माहिती संस्थेच्या समूहावर पाठविताच संस्थेचे ऑन कॉल नवतरुण

तडफदार रक्तदाते साईराज गिरप (उभादांडा ता. वेंगुर्ला) हे ताबडतोब रात्री साडेनऊ वाजता क्षणाचाही विचार न करता जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये गेले आणि त्यांनी अनमोल असे रक्तदान केले. विशेष म्हणजे त्यांचे जिवलग मित्र आणि ऑन कॉल रक्तदाते संस्थेचेच दुर्मिळ रक्तदाते जय मांजरेकर हे त्यांना जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये घेऊन गेले होते.
अतिशय महत्वाची बाब अशी होती की दुसऱ्या दिवशीच म्हणजे गुरुवारी साईराज गिरप यांच्याकडे गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता. असे असतानाही पेशंटचा जीव धोक्यात आहे, हे समजताच ते आपला मित्र जयला घेऊन ताबडतोब रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करुन आले.
रक्तदाता साईराज गिरप आणि जय मांजरेकर यांच्यासहीत ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे पेशंटच्या नातेवाईकांनी आभार मानलेत आणि रक्तदान क्षेत्रात एवढे मौल्यवान कार्य करणाऱ्या संस्थेला गरज पडेल त्यावेळी सर्वतोपरी वाट्टेल ते सर्व सहकार्य करण्याचे नातेवाईकांनी संस्थेला अभिवचन दिले.
घरात शुभकार्य असतानाही रक्तदान करुन रुग्णाचा जीव वाचविण्याचे मौलिक कार्य केल्याबद्दल साईराजचे आणि त्याला योग्य ते सहकार्य केल्याबद्दल जय मांजरेकरचे ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंदजी गवस यांनी कौतुक केले आहे.