शिरोडा वेळागर येथील नियोजित ताज प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळयास वेळागर वासियांचा झाला तीव्र विरोध!स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय एक इंचही जागा घेणार नाही : पर्यटन मंत्री गिरीश महाजन


शिरोडा वेळागर येथील नियोजित ताज प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळयास वेळागर वासियांचा झाला तीव्र विरोध
स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय एक इंचही जागा घेणार नाही : पर्यटन मंत्री गिरीश महाजन
शेतकरी संघटना झाली आक्रमक !मंत्र्यांच्या गाड्या अडविल्या
पोलिसांशी हुज्जत.
शिरोडा
शिरोडा वेळागर येथील नियोजित ताज प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पर्यटन मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत वेळागर येथे संपन्न झाला. यादरम्यान शेतकरी संघटनेने जोरदार घोषणा बाजी करत आपला विरोध दर्शविला. पोलिसांशी ही हुज्जत घातली. दरम्यान कार्यक्रम आटपून परतणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या या संघटनेने धावत जाऊन अडविल्या. मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी संघटनेशी बोलण्यास सामोरे जाऊन लिंगेश्वर मंदिर येथे त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी स्थानिकांना विश्वासात घेतल्या शिवाय एक इंचही जागा शासन घेणार नाही असा शब्द दिला. त्यामुळे संघटनेने आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेडागर येथील ताज प्रकल्पाचा प्रश्न गेले वीस वर्षे सुरू आहे. येथील स्थानिकांना त्रासदायक ठरणारी नऊ हेक्टर जमीन वगळावी अशी स्थानिक शेतकरी संघटनेची मागणी आहे. यासाठी अनेक वेळा आंदोलने उपोषणे करण्यात आली. दरम्यान शासनातर्फे आज सायंकाळी वेळागर लिंगेश्वर मंदिराच्या बाजूला या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र शासनाकडून आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही भूमिपूजन करण्यास देणार नाही असा इशारा स्थानिक शेतकरी संघटनेने दिला होता.

ताज प्रकल्पाचे अखेर तीस वर्षांनी झाले भूमिपूजन
ताज प्रकल्पाचे श्री लिंगेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेत
सायंकाळी तब्बल 30 वर्षांनी भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पर्यटनमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री
दीपक केसरकर, ताज चे अधिकारी बिजल देसाई, माजी आम.शंकर कांबळी, राजन तेली, जिल्हाधिकारी अनिल पाटील, तहसीलदार ओंकार ओतारी, जगन्नाथ डोंगरे, जनू पडवळ, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शिवसेना नेते सचिन वालावलकर, गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या सहलोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.भूमिपूजन कार्यक्रम स्थळी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करणारे फलक लावण्यात आले होते.