ठळक घडामोडी

मळगाव इंग्लिश स्कूल प्रशालेने राबविला बांधावरची शाळा उपक्रम

मळगाव इंग्लिश स्कूल प्रशालेने राबविला बांधावरची शाळा उपक्रम

शेतीच्या विविध कामांचा शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव

सावंतवाडी :

तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेच्या शिक्षकांनी मुलांसोबत बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत शाळेजवळच असलेल्या गोविंद कानसे यांच्या शेतात जाऊन शेतीच्या विविध कामांचा आनंद लुटत बांधावरची शाळा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविला. यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी नांगरणी, तरवा काढणी, भात लावणी आदी शेतीच्या विविध कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने “बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम दरवर्षी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येतो. विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शेतकरी म्हणजेच बळीराजाबद्धल आदर व प्रेम निर्माण व्हावे, आपला देश शेतीप्रधान असल्याने शेतीविषयी माहिती मिळावी, मुलांना शेतीचे महत्व पटावे, शेतीसाठी लागणाऱ्या बी-बियाणांची ओळख व्हावी, शेतीची अवजारे, खते, कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा, या हेतूने हा उपक्रम राबविला जातो. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेतील शिक्षक व मुलांनी शाळेजवळ असलेले शेतकरी गोविंद कानसे यांच्या शेतामध्ये जाऊन एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात सहभाग घेत प्रत्यक्ष बांधावरच शाळा भरविली. यावेळी शेतकरी कानसे यांनी मुलांना शेतीविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी मुलांना आधुनिक शेती अवजारांची प्रात्यक्षिक दाखवत ती कशी चालवावीत याविषयी माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक मारुती फाले यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष शेतात उतरून तरवा काढणी व भात लावणी आदी शेतीच्या कामांचा आनंद लुटला. यावेळी फाले यांनी कानसे यांच्याबरोबर प्रत्यक्ष ट्रॅक्टर चालविण्याचाही अनुभव घेतला. उपक्रमात विद्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक मारुती फाले यांच्याबरोबर शाळेचे शिक्षक अभिजीत गावडे, प्रकाश केसरकर, पालक-शिक्षक संघाचे सदस्य सिद्धेश तेंडोलकर आदी सहभागी झाले होते.