

पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा!व्हाईस ऑफ मीडियाने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन

सिंधुदुर्गनगरी :
लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट होण्याऐवजी काही समाजकंटकांकडून त्या स्तंभाची बदनामी आणि त्या स्तंभाचे पाईक असणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत या पार्श्वभूमीवर आज व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेने ठोस पावले उचलत जिल्हाधिकारी तृप्ती धोंडभिसे वसिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांना निवेदन सादर करून सदर निवेदनाद्वारे त्यांचे लक्ष वेधले आहे.
निवेदन देते वेळी संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सचिव शैलेश मयेकर, कार्याध्यक्ष अनंत धोंड, कार्याध्यक्ष भूषण सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष आप्पा राणे, कुडाळ तालुकाध्यक्ष चिन्मय घोगळे, प्रसिद्धी प्रमुख दीपक पटेकर तसेच संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रथमेश गवस, दोडामार्ग तालुका सचिव प्रतीक राणे, सदस्य साबाजी परब यांसह अन्य उपस्थित होते.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग संघटनेने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेले पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे व किरण ताजणे यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी नुकताच जीवघेणा हल्ला केला. पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीस काळीमा फासणारी आणि चौथ्या स्तंभावर सरळ आघात करणारी बाब आहे.
कारण पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि सामाजिक प्रश्न यांवर प्रकाश टाकतात. अशा व्यक्तींवर हल्ला होणे हे लोकशाहीतील गंभीर आणि धोक्याचे लक्षण आहे. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोवर कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे संपादक व सिंधुदुर्गातील ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांना काही लोकांनी मोबाईलवरून फोन करून त्यांनी सतत सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांबाबत उठविलेला आवाज दाबण्याचा तसेच धमकावण्याचा प्रकार केला आहे.
सदरची घटना अत्यंत गंभीर आहे. कारण सिताराम गावडे हे सातत्याने सिंधुदुर्गातील अवैध धंदे जसे की गोवा बनावटीची दारू, जुगार, मटका व ड्रग्स यांबाबत आवाज उठवत आहेत. वास्तविक जे काम प्रशासनाने करायला हवे ते काम लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातून ते करीत आहेत.
तसेच कुडाळ येथील पत्रकार चिन्मय घोगळे यांनी वाळू तस्करीच्या विरोधात बातमी केल्यावर त्यांना देखील सोशल मीडियावरून धमक्यांचे मेसेज येत आहेत.
याच अनुषंगाने व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आपणास सदर निवेदन सादर करून सदर घटनांची आपण वस्तुनिष्ठ चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करीत आहोत, असे नमूद करीत जिल्हा पोलीस अधीक्षकांचे या गंभीर घटनेकडे लक्ष वेधले आहे.
दरम्यान यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांचे व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेकडून रोप देऊन स्वागतही करण्यात आले.





