ठळक घडामोडी

मोठी बातमी: महाराष्ट्रात निवडणुकांचा धडाका! २९ महापालिकांनंतर आता १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मोठी बातमी: महाराष्ट्रात निवडणुकांचा धडाका! २९ महापालिकांनंतर आता १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई:

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून, निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा केली आहे. १५ जानेवारीला राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होणार असतानाच, आता १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत या निवडणुकांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले.
महत्त्वाच्या तारखा (वेळापत्रक):
निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, निवडणूक प्रक्रिया खालीलप्रमाणे पार पडेल:

  • अधिसूचना प्रसिद्ध होणे: १६ जानेवारी २०२६
  • उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत: १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६
  • अर्जांची छाननी: २२ जानेवारी २०२६
  • अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
  • चिन्ह वाटप: २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३:३० नंतर)
  • मतदान: ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७:३० ते ५:३०)
  • निकाल (मतमोजणी): ७ फेब्रुवारी २०२६
    या १२ जिल्ह्यांत होणार निवडणूक:
    सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या निर्देशानुसार, ज्या जिल्ह्यांत आरक्षणाची अट पाळली गेली आहे अशा १२ जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक होत आहे:
    १. रायगड २. रत्नागिरी ३. सिंधुदुर्ग ४. पुणे ५. सातारा ६. सांगली ७. कोल्हापूर ८. सोलापूर ९. छत्रपती संभाजीनगर १०. परभणी ११. धाराशिव १२. लातूर.
    निवडणुकीची काही खास वैशिष्ट्ये:
  • प्रशासक राज संपणार: गेल्या अनेक वर्षांपासून या स्थानिक संस्थांवर प्रशासक नियुक्त होते, आता तिथे लोकप्रतिनिधी निवडले जातील.
  • मतदार यादी: १ जुलै २०२५ ची अद्ययावत मतदार यादी या निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे.
  • यंत्रणा सज्ज: सुमारे १ लाख २८ हजार कर्मचारी आणि २५ हजारहून अधिक मतदान केंद्रे या प्रक्रियेसाठी सज्ज करण्यात आली आहेत.
  • EVM चा वापर: ही संपूर्ण निवडणूक ईव्हीएम (EVM) मशीनद्वारे पार पडणार आहे.
    राज्यात १५ जानेवारीला मुंबईसह २९ मोठ्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचे मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ जानेवारीला त्याचे निकाल लागतील. त्यानंतर लगेचच ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची रणधुमाळी सुरू होणार असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे.