ठळक घडामोडी

भविष्याच्या पिढीला सुंदर हस्ताक्षराचे बाळकडू: संस्कार नॅशनल स्कूलमध्ये स्तुत्य उपक्रम!

भविष्याच्या पिढीला सुंदर हस्ताक्षराचे बाळकडू: संस्कार नॅशनल स्कूलमध्ये स्तुत्य उपक्रम!

सावंतवाडी

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय हस्ताक्षर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी दिलेल्या वेळेत एका विशिष्ट उताऱ्याचे सुंदर आणि सुवाच्य अक्षरात लेखन केले.
या स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती प्रणाली रेडकर मॅडम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना त्यांनी हस्ताक्षराचे महत्त्व विशद केले आणि विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनात त्याचे महत्त्व कसे आहे, हे समजावून सांगितले. “आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व कमी झालेले नाही. ते केवळ आपले विचार प्रभावीपणे मांडण्यास मदत करत नाही, तर आपले व्यक्तिमत्त्वही घडवते,” असे त्या म्हणाल्या.


स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री.पांडुरंग मिशाळ सर आणि श्रीमती रुची देसाई मॅडम असे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचा निकाल लवकरच घोषित केला जाईल आणि विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित केले जाईल. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुंदर हस्ताक्षराविषयी जागरूकता वाढण्यास नक्कीच मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.