ठळक घडामोडी

गणिताच्या प्रत्येक आकड्यात मी विद्यार्थ्यांचे भविष्य पाहिले’ – ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीरा विलास नाईक

‘गणिताच्या प्रत्येक आकड्यात मी विद्यार्थ्यांचे भविष्य पाहिले’ – ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीरा विलास नाईक

तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील ज्येष्ठ गणित शिक्षिका सौ. मीरा विलास नाईक यांचा त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकताच सेवानिवृत्तीपर सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सौ. नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त करत शिक्षण संस्थेबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शिक्षण संस्था माझ्यासाठी देव ठरली’
आपल्या मनोगतात सौ. मीरा नाईक म्हणाल्या, “गणिताच्या प्रत्येक आकड्यात मी विद्यार्थ्यांचे भविष्य पाहिले. प्रत्येक गणनेत मी त्यांचे यश मोजले. विद्यार्थी जेव्हा म्हणायचे ‘मॅडम मला गणित समजलं’, तेव्हा वाटायचं आजचा दिवस फळाला आला.” त्यांनी शिक्षण संस्थेला ‘देव’ आणि विद्यालयाला ‘देवालय’ मानले. विद्यालयाच्या वास्तूने आपल्या घामाचे थेंब पाहिले आणि त्या सिंचनातून अनेक विद्यार्थी घडताना पाहिल्याचे त्या म्हणाल्या.

विद्यार्थिनी ते सेवानिवृत्त शिक्षिका
११ जून १९९० रोजी शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या सौ. नाईक यांनी या वास्तूत पहिले पाऊल विद्यार्थिनी म्हणून ठेवले होते आणि आज सेवानिवृत्त शिक्षिका म्हणून जात असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. आदर्श शिक्षक असलेले आजोबा, वडील आणि आत्या यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी शिक्षिका बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य आणि तत्कालीन मुख्याध्यापक यांच्या एकमताने झालेल्या निवडीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
“आज सेवा संपते आहे, पण नाते नाही, नोकरी संपते, पण आपुलकी नाही. आज मी एक पाऊल मागे घेत आहे, पण या शाळेचा सुगंध माझ्या श्वासात कायम राहील,” असे भावूक उद्गार त्यांनी काढले.
🌟 मुख्याध्यापकांनी केले कौतुक
यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री. प्रतापराव देसाई यांनी सौ. नाईक यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांच्या सेवा कलावधीत मी मॅडम यांना एकही दिवस बसून शिकवताना पाहिलेले नाही. जो आपल्या विषयात तज्ञ असतो, त्याला कधीही वर्गात बसण्याची वेळ येत नाही. मॅडम आपल्या विषयात तज्ञ आणि ज्ञानसंपन्न होत्या.”
श्री. देसाई यांनी सभागृहाच्या छतासाठी देणगी देणाऱ्या तीन दात्यांपैकी सौ. नाईक या एक असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्यांसाठी लागणाऱ्या सर्व प्रतिमा भेट दिल्या असून, यातून त्यांच्या ठायी असलेला राष्ट्रपुरुषांविषयीचा आदर आणि राष्ट्रभक्तीचा प्रत्यय येतो, असेही ते म्हणाले.
💐 मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार
शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथे हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. भालचंद्र कांडरकर यांच्या हस्ते श्री सरस्वती देवीच्या प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलनाने झाले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडेचे खजिनदार डॉ. भालचंद्र कांडरकर, संचालक सुरेश गावडे, रविंद्र परब, प्रा.दिलीप गोडकर, संस्था सदस्य देवेश कावळे, मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उमेश पावणोजी, विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका सौ. अश्विनी कुलकर्णी, सौ रंजना सावंत, सेवानिवृत्त बँक अधिकारी विलास नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सौ. मीरा विलास नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, श्री सरस्वती देवीची मूर्ती व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांचे पती सेवानिवृत्त बँक अधिकारी विलास नाईक यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक प्रसाद आडेलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक किशोर नांदिवडेकर यांनी केले. याप्रसंगी अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत सौ. नाईक यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.