ठळक घडामोडी

गणेशोत्सवाच्या तयारीने सिंधुदुर्गातील गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या!

गणेशोत्सवाच्या तयारीने सिंधुदुर्गातील गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या!

सिंधुदुर्ग:

गणेशोत्सवाला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्ती बनवणाऱ्या चित्रशाळांमध्ये लगबग वाढली आहे.

मूर्तिकार रात्रंदिवस एक करून गणेश मूर्तींना अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांतील चित्रशाळा सध्या बाप्पाच्या विविध रूपांनी आणि कारागिरांच्या कौशल्याने गजबजून गेल्या आहेत.
गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच उत्साहाचे प्रतिबिंब चित्रशाळांमध्येही दिसत आहे. लहान, मोठ्या आणि मध्यम आकाराच्या आकर्षक गणेश मूर्ती घडवण्यासाठी कारागीर कसून मेहनत घेत आहेत. मातीच्या मूर्ती, शाडूच्या मूर्ती तसेच फायबरच्या मूर्तींना अंतिम हात फिरवले जात आहेत. रंगरंगोटी, मूर्तींना डोळे भरणे, दागिने आणि वस्त्रांनी सजवणे अशी विविध कामे वेगाने सुरू आहेत.यावर्षी गणेशभक्तांकडून पारंपरिक मूर्तींबरोबरच पर्यावरणपूरक मूर्तींनाही अधिक पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे. अनेक मूर्तिकारांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार केल्या आहेत. तसेच, आकर्षक देखाव्यांसाठी लागणाऱ्या मूर्तींवरही विशेष लक्ष दिले जात आहे.
गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असल्या तरी, मूर्तिकारांनी भाव वाढवून भक्तांना कोणताही अतिरिक्त भार दिला नसल्याचे काही मूर्तिकारांनी सांगितले. त्यामुळे गणेशभक्तांना वाजवी दरात सुंदर मूर्ती उपलब्ध होणार आहेत.
येत्या काही दिवसांत या मूर्ती गणेशभक्तांच्या घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान होतील आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करतील. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथीलगणेश मूर्तिकार कारागीर ज्ञानदेव गावडे यांच्या गणेश चित्रशाळा सद्या गजबजून गेली आहे.