

विद्यार्थ्यांच्या यशामध्ये गुणांपेक्षा शिस्त, आदर आणि संस्कारांचे महत्त्व अधिक – ॲड. संतोष सावंत
विद्यार्थ्यांच्या यशामध्ये गुणांपेक्षा शिस्त, आदर आणि संस्कारांचे महत्त्व अधिक – ॲड. संतोष सावंत
देशभक्त शंकरराव गवाणकर कॉमर्स कॉलेजचा ‘संकल्प २०२६’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; १५ वर्षांत ९०० हून अधिक विद्यार्थी घडले
सावंतवाडी | प्रतिनिधी
“जग बदलत आहे आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे, मात्र माणसांमधील नातेसंबंध आजही केवळ वागणुकीवरच टिकून आहेत. परीक्षेत मिळवलेले गुण महत्त्वाचे असले तरी, ज्या विद्यार्थ्याकडे शिस्त, आदर आणि प्रामाणिकपणा आहे, तोच जीवनाच्या स्पर्धेत दीर्घकाळ टिकून राहतो. आजच्या एआय (AI) च्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवावे,” असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत यांनी केले.
सावंतवाडी येथील लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ‘संकल्प २०२६’ या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकमान्य ट्रस्टचे संचालक सचिन मांजरेकर, सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुस्कर आणि प्राचार्य यशोधन गवस उपस्थित होते.
कॉलेजचे १५ वर्षांचे योगदान कौतुकास्पद
ॲड. सावंत पुढे म्हणाले की, “हे कॉलेज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले बिझनेस मॅनेजमेंट कॉलेज असून, गेल्या १५ वर्षांत या संस्थेने ९०० हून अधिक यशस्वी विद्यार्थी घडवले आहेत. संस्थापक किरण ठाकूर यांनी ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची दारे उघडून शैक्षणिक क्रांती घडवली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी न घेता वाचनाची आणि लेखनाची आवड जोपासावी.”
दोन वर्षात स्वतःची भव्य वास्तू आणि नवीन कोर्सेस
कार्यक्रमाचे अध्यक्ष व लोकमान्य ट्रस्टचे संचालक सचिन मांजरेकर यांनी कॉलेजच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, “हे कॉलेज आता लवकरच स्वतःच्या भव्य जागेत स्थलांतरित होणार असून, येत्या दोन वर्षांत बिझनेस मॅनेजमेंटचे उच्च दर्जाचे धडे येथे दिले जातील.” ट्रस्टचे प्रवीण प्रभू केळुस्कर यांनीही संस्थेच्या विविध शैक्षणिक प्रकल्पांची माहिती देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक आणि सन्मान
प्राचार्य यशोधन गवस यांनी कॉलेजच्या प्रवासाचा आढावा घेतला. २०१० मध्ये सुरू झालेल्या या कॉलेजने आज जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ॲड. संतोष सावंत, सचिन मांजरेकर व प्रवीण प्रभू केळुस्कर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांनी ‘संकल्प २०२६’ अंतर्गत विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी सूत्रसंचालन: आदिती कळंगुटकर व आर्या वेळणेकर. आभार प्रदर्शन: दिव्या काकतकर. नियोजन: जनरल सेक्रेटरी सर्वेश नाईक, अमर धोंड, संतोष सावंत, प्रवीण तुयेकर व सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी प्रा. आनंद नाईक, साईप्रसाद पंडित, अस्मिता गवस, मेधा मयेकर, शैलेश गावडे, लेखा दुबळे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





