ठळक घडामोडी

ध्येय निश्चिती आणि चिकाटीच यशाचा खरा मार्ग; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदूर्ग विजय काळे यांचे प्रतिपादन

ध्येय निश्चिती आणि चिकाटीच यशाचा खरा मार्ग; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदूर्ग विजय काळे यांचे प्रतिपादन

तळवडे येथील श्री जनता विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

तळवडे (प्रतिनिधी):

“आपले करिअर हे शालेय जीवनापासूनच घडायला सुरुवात होते. विज्ञानासारखे विषय तलवारीसारखे आहेत, त्याचा वापर जपून करा. आपल्यातील जिज्ञासा आणि चिकाटी कधीही संपू देऊ नका, कारण हीच चिकाटी आपल्याला यशाकडे घेऊन जाते,” असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले.
तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार डॉ. भालचंद्र कांडरकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे उपस्थित होते.

कोणतेही क्षेत्र कनिष्ठ नसते: संदीप गावडे

यावेळी बोलताना संदीप गावडे म्हणाले की, “यशस्वी होणे ही सोपी गोष्ट आहे, मात्र माणूस तिला अवघड बनवतो. शैक्षणिक जीवनाच्या सुरुवातीलाच ध्येय निश्चित केले तर यशाची खात्री शंभर टक्के असते. कोणतेही क्षेत्र श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते, आपल्या कर्तृत्वाने त्या क्षेत्राला मोठे करायचे असते. प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च अधिकारी हे बहुतांश कला शाखेतूनच पुढे आलेले आहेत, त्यामुळे कोणत्याही शाखेला कमी लेखू नका.”

मान्यवरांचा सत्कार व पारितोषिक वितरण

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी संस्थेच्या वतीने संदीप गावडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, नीलकंठ नागडे आणि नगरअभियंता विशाल होडवडेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. शालेय जीवनात विविध गुणदर्शन घडवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना, तसेच विविध शिष्यवृत्ती व प्रोत्साहनात्मक पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विविध प्रदर्शनांचे आयोजन
स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यालयात चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या कलाकृतींचे पाहुण्यांनी विशेष कौतुक केले.
व्यासपीठावरील उपस्थिती
या सोहळ्याला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पेडणेकर, संचालक रवींद्र परब, सुरेश गावडे, प्रा. दिलीप गोडकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, सरपंच वनिता मेस्त्री, रविंद्र परब,मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर यांच्यासह शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद बांगर यांनी केले, अहवाल वाचन मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत अंकुश चौरे यांनी, तर आभार प्रदर्शन किशोर नांदिवडेकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद आडेलकर यांनी प्रभावीपणे केले.