

कुडाळच्या मातीतील कलेचा सातासमुद्रापार डंका !


कुडाळच्या मातीतील कलेचा सातासमुद्रापार डंका !
शिल्पकार जयेश धुरी यांचा प्रेरणादायी प्रवास
कुडाळ
: कुडाळमधील एका हरहुन्नरी कलाकाराने आपल्या कलेच्या जोरावर केवळ कोकणच नव्हे, तर थेट अमेरिकेपर्यंत आपली ओळख निर्माण केली आहे. कुडाळ तालुक्यातील आकेरी गावचे रहिवासी शिल्पकार जयेश धुरी यांनी गेल्या १० वर्षांपासून शिल्पकलेच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. कुडाळ येथे ‘शिल्प धाम’ या कार्यालयाच्या माध्यमातून ते कोकणातील संस्कृती आणि इतिहासाला मूर्त रूप देत आहेत.

जयेश धुरी यांना कलेची जन्मजात आवड असल्याने त्यांनी प्रथम रायगड येथील ‘आकार पॉट आर्ट’मध्ये दोन वर्षे मातीकामाचे धडे गिरवले. त्यानंतर मुंबई कला महाविद्यालयातून फाउंडेशन आणि प्रतिष्ठित सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून शिल्पकलेचे उच्चशिक्षण पूर्ण केले. जयेश धुरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध किंवा विविध स्वातंत्र्यसैनिकांची सुबक शिल्प बनविली आहेत. त्यांच्या कलेची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने त्यांना प्राज्य पुरस्कार देऊन गौरविले आहे. तसेच, कोकणातील ४००-५०० वर्षे जुन्या ‘देव तरंग’ या प्रथेवर आधारित त्यांनी साकारलेल्या कलेसाठी त्यांना ‘बी. व्ही. तालिम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जयेश धुरी यांनी साकारलेली शिल्पे आज फायबर, मेटल आणि क्ले अशा विविध माध्यमांतून महाराष्ट्रासह परराज्यातही पोहोचली आहेत. विशेष म्हणजे, अलीकडेच त्यांच्या एका कलाकृतीला अमेरिकेतून मागणी आली असून ती तिथे रवाना झाली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.






